पुणे : राज्यातील ऊस दराची कोंडी फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ साठी प्रती टन ३३५० रुपये ऊस दर जाहीर केला आहे. एफआरपीपेक्षा जास्त देणारा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा कारखाना ठरला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळातर्फे आयोजित बैठकीत या ऊस दरावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ही माहिती दिली.
हॅलो कृषी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की गेल्या पाच हंगामात साखर कारखाना ३,००० रुपयांहून अधिक दर देत आहे. आम्ही कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सभासद आणि बिगर सभासद असा भेदभाव करीत नाही. सर्वांना समान बिल दिले जाते. यापुढेही कारखाना कार्यक्षेत्रातील आणि बाहेरीलही सभासद शेतकऱ्यांना चांगला दर देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, कारखान्याने गेल्या हंगामात १२ लाख ५६ हजार ६६८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. साखर कारखान्याने गेल्यावर्षी उसाला प्रती टन २,८५० रुपये दिले होते. यात संचालक मंडळाने ५० रुपये प्रती टन वाढवून २९०० रुपये दर दिला आहे. आता या नव्या निर्णयाने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ४५० रुपये मिळणार आहेत.