शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील मोजकेच अधिकारी व कामगारांना अशा ९६ जणांना प्रशासनाने पगारवाढ केली. त्यामुळे उर्वरित कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. सर्वच अधिकारी व कामगारांना पगारवाढ मिळावी यासाठी कामगार आक्रमक बनले. या असंतोषामुळे कामगारांनी काम बंद ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर कारखाना संचालक मंडळाने मोजक्याच ९६ जणांना केलेली पगारवाढ रद्द करीत असल्याचे पत्र पगारवाढीची मागणी करणाऱ्या उर्वरित कामगारांच्या एका गटाला दिले.
दरम्यान, पगारवाढ केलेल्या कामगारांचा पगार कमी करा अशी आमची मागणी नाही, तर सर्वच कामगारांना पगारवाढ करा किंवा अधिकाऱ्यांना प्रतिमहिना ५००० रुपये व कामगारांना ३००० रुपये सरसकट पगारवाढ करा, अशी मागणी या वेळी कामगारांनी केली. पगारवाढी पासून वंचित राहिलेल्या कामगारांनी बुधवारी कारखाना कार्यस्थळावर एकत्र येत प्रशासनाला ज्या ९६ अधिकारी व कामगारांना पगारवाढ केली, त्याचे ठराव – इतिवृत्त व यादी मिळावी तसेच बारामती तालुका साखर कामगार सभेच्या दोन्ही संघटनेशी झालेल्या नवीन पगारवाढ कराराची प्रत मिळावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने सरसकट सर्वांना पगारवाढ द्यावी अशी मागणी लावून धरली.