बाडमेर रिफायनरी “वाळवंटातील दागिना” बनेल जी राजस्थानच्या लोकांना रोजगार, संधी आणि आनंद मिळवून देईल: हरदीप एस पुरी

बाडमेर रिफायनरी “वाळवंटातील दागिना” (रेगिस्तान का नगीना) बनेल , जी राजस्थानच्या लोकांना रोजगार, संधी आणि आनंद मिळवून देईल, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी यांनी आज एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेडच्या संकुलात पत्रकारांना संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया संकल्पनेनुसार या प्रकल्पाची आखणी करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त उद्यम कंपनीद्वारे राजस्थान मधील बाडमेर येथे ग्रीनफिल्ड रिफायनरी अधिक पेट्रोकेमिकल संकुल स्थापन केले जात आहे, ज्यात एचपीसीएलचा 74% आणि राजस्थान सरकारचा 26 % हिस्सा आहे.

2008 मध्ये या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती आणि सुरुवातीला 2013 मध्ये मंजूर करण्यात आली होती. नंतर पंतप्रधानांनी त्याची पुनर्रचना केली आणि 2018 मध्ये कामाला सुरुवात झाली.

कोविड 19 महामारीच्या 2 वर्षांच्या काळात अनेक अडचणी उभ्या ठाकल्या , मात्र त्यावर मात करून 60% पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण झाला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी सांगितले की एचआरआरएल रिफायनरी कॉम्प्लेक्स 9 MMTPA कच्च्या मालावर प्रक्रिया करेल आणि 2.4 दशलक्ष टनपेक्षा जास्त पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन करेल, परिणामी पेट्रोकेमिकल्समुळे आयात बिल कमी होईल. हा प्रकल्प केवळ पश्चिम राजस्थानसाठी औद्योगिक केंद्राचा उच्च तंत्रज्ञान आधारित उद्योग नाही तर 2030 पर्यंत 450 MMTPA रिफायनिंग क्षमता साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला दिशा देण्याचे काम करेल, असे ते म्हणाले.

हा प्रकल्प पेट्रोकेमिकल्सला आयात पर्याय म्हणून भारताला स्वयंपूर्ण बनवेल, असेही पुरी म्हणाले. सध्याची आयात 95000 कोटी रुपये इतकी आहे, एचआरआरएल रिफायनरी कॉम्प्लेक्स सुरु झाल्यानंतर आयात बिल 26000 कोटी रुपयांनी कमी होईल.

रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे सामाजिक-आर्थिक फायदे अधोरेखित करताना पुरी म्हणाले की या प्रकल्पाने संकुलात आणि आसपासच्या परिसरात सुमारे 35,000 कामगारांना काम दिले आहे. तसेच सुमारे 1,00,000 कामगार अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत.

तसेच सुमारे 600 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 12 वी पर्यंतची शाळा सुरु करण्यात येणार आहे. “शाळेसाठी जमीन संपादित करण्यात आली आहे आणि इमारतीच्या रचनेला अंतिम रूप देण्यात आले असून बांधकाम सुरू झाले आहे आणि ते डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या परिसरातील ही पहिली शाळा असेल.” असे ते म्हणाले.

50 खाटांचे रुग्णालय देखील बांधण्यात येत आहे. जमीन संपादित करण्यात आली असून ते डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल असे पुरी यांनी सांगितले. रिफायनरीच्या स्थापनेमुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी वाढल्याबाबत पुरी म्हणाले की, परिसरातील गावांसाठी रस्ते बांधल्यानंतर या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल.

या प्रकल्पाच्या पर्यावरणीय लाभांचाही त्यांनी उल्लेख केला. रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये डेमोइसेल क्रेन सारख्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी पाणथळ अधिवास विकसित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाला लाभदायक अशा इतर कामांमध्ये नैसर्गिक जलाशयांचे पुनरुज्जीवन आणि पाचपदरा ते खेड या मार्गावर वृक्षारोपण यांचा समावेश आहे. तसेच जमिनीत क्षाराचे मोठे प्रमाण लक्षात घेऊन संकुलातील वाळवंटी जमिनींचे हरित पट्ट्यात रूपांतर करण्यासाठी एएफआरआय -AFRI द्वारे अभ्यास केला जात आहे. शिफारशी प्राप्त झाल्यानंतर वन विभागाच्या मदतीने वृक्षारोपण केले जाईल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here