कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक बडे नेते दोन्ही आघाड्यांकडून प्रचारात उतरले आहेत. दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदार आणि तब्बल पाच माजी आमदारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने नेते प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारखान्याची निवडणूक साडेतीन तालुक्यांच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी असल्याने दोन्ही आघाड्यांकडून चुरशीने प्रचार केला जात आहे.
सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे सत्तारुढ आघाडी आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे विरोधी आघाडीच्या पॅनेलचा प्रचार करत आहेत. त्याचप्रमाणे आमदार सतेज पाटील हे सत्तारूढचे नेतृत्व करत आहेत, तर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खांद्यावर विरोधी आघाडीची धुरा आहे. खासदार संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक हे विरोधी आघाडीकडून प्रचाराच्या रिंगणात आहेत. माजी आमदारांपैकी के. पी. पाटील, दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे हे चौघे सत्तारूढ आघाडीकडून प्रचार करीत आहेत. विरोधी आघाडीचा प्रचार माजी आमदार अमल महाडिक हे करत आहेत.
बिद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र राधानगरी, भुदरगड, कागल हे तीन तालुके आणि करवीर तालुक्यातील काही गावे असे साडेतीन तालुक्यांचे आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल २१८ गावे असून सर्वाधिक मतदार आहेत. कमी वेळेत नेत्यांना प्रत्येक भागात प्रचार करावा लागत आहे. दोन्ही आघाड्यांकडून नेत्यांना प्रचारासाठी तालुक्यांची जबाबदारी ठरवून दिली आहे. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक हे ताकदीने प्रचारात उतरले आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या सभाही होत आहेत.