बीड : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे याचा परिणाम शेती उत्पन्नावर होउन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. त्यात उसाच्या उत्पादनास फटका बसतो. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यानुसार उस दर देणार आहे अशी घोषणा आमदार प्रकाश सोळंके यांनी केली. सोळंके साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते गळीत हंगामाची सुरवात करण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक धैर्यशिल सोळंके, कारखाना अध्यक्ष वीरेंद्र सोळंके यांच्या उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून प्रारंभ करण्यात आला.
आमदार सोळंके यांनी सांगितले की, यावर्षी साडेसहा लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उद्दिष्ट असून दोन कोटी लिटर इथेनॉल उत्पादन, ४.७५ कोटी युनिट विज निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण निश्चित केले आहे. यंदाच्या गाळप हंगामात सरासरी ११ टक्के साखर उतारा मिळाल्यास एफआरपीप्रमाणे २,८५० रूपये उसाचा हमीभाव अदा करण्यात येणार आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत हा दर निश्चीतच जास्त आहे. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर, सरपंच, उपसरपंच, विविध संस्था पदाधिकारी, ऊस उत्पादक, सभासद, उसतोड वाहतूक ठेकेदार यांचेसह सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.