कोल्हापूर / बीड : कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांवर मजूर म्हणून काम करणाऱ्या आई-वडिलांसोबत जिल्ह्यातील १,८३९ मुले होती. त्यांचा बोगस हजेरीपट दाखवून बीडमध्ये हंगामी वसतिगृह चालविले जात असल्याचा आरोप झाला होता. याबाबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. मात्र, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बीड जिल्ह्यात सध्या १९६ हंगामी वसतिगृहे सुरू असल्याचा दावा केला. सध्या जी मुले कोल्हापुरात आहेत, ते लाभार्थी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर येथील अवनी संस्थेने बीड जिल्ह्यातील मजुरांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन ० ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले. यात १८३९ मुले हे पालकांसोबत असल्याचे समोर आले होते. तसेच जे तिकडे आहेत, अशा मुलांची हजेरी बीडमध्ये असल्याचेही समोर आले होते. त्याचीच दखल घेत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देत, जी मुले कोल्हापुरात होती, ते लाभार्थी नसल्याचा दावा केला. दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास ८ लाख कामगार हे राज्यासह परराज्यात ऊसतोडणीसाठी जात असतात. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात आली होती. याचा २१ हजार मुले लाभ घेत असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला होता.
साखर उद्योगाच्या बातम्या आणि संबंधित चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.