बीड : ऊस तोडणीच्या हंगामात वाहतूक कामगारांचे प्रचंड हाल ऊसतोडणी करताना होत असतात. त्यांच्या शारीरिक कष्ट याबरोबरच अनेक सामाजिक समस्या देखील आहेत. रात्री-अपरात्री फडात ऊसतोडणी करावी लागते. त्याचबरोबर करताना रस्त्यावरील धावणाऱ्या वाहनांबरोबर जा-ये करावी लागते. यावेळी रस्ते अपघाताचा धोका पत्करावा लागत असतो. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांचा अपघाती जीवन विमा उतरवण्याची आवश्यकता असते. यावर्षी गळीत हंगाम सुरू होऊन देखील विमा पॉलिसीचा प्रश्न प्रलंबित आहे. येत्या आठ दिवसात पॉलिसीचा प्रश्न निकाली काढला नाही, तर ऊस तोडणी करणारे कामगार ‘कोयता बंद’ आंदोलन करतील, असा इशारा लोकनेते गोपीनाथरावजी ऊस तोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेचे प्रदेश संघटक आ. सुरेश धस यांनी दिला आहे.
आष्टी येथे आयोजित मुकादम संघटनेच्या संवाद बैठकीमध्ये आमदार धस बोलत होते. ते म्हणाले की, राज्यामध्ये गळीत हंगाम सुरू असून अद्यापही ऊसतोडणी कामगारांच्या अपघाती विम्याचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. ऊसतोडणी कामगारांच्या जीविताचा हा प्रश्न असल्यामुळे आठ दिवसात विमा पॉलिसी काढण्यात यावी. अन्यथा राज्यातील सर्व कारखान्यावरील कामगार कोयता बंद आंदोलन करतील. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सानप, बाबूराव केदार, सुरेश वणवे, शिवाजी पवार, तात्याराम हुले
उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा: बीड – वैद्यनाथ – ओंकार उसाला २७५० रुपये भाव देणार : चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.