बीड : पोटाची खळगी भरण्यासाठी बिऱ्हाड घेऊन सहा सहा महिने दुसऱ्याच्या शेतातील ऊस तोडून गुजराण करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या जीवनात ‘रेशीम क्रांती’ आली आहे. उसतोड करण्याऐवजी रेशीम उद्योग करून एकरी साधारणपणे तीन लाखाचे उत्पन्न मिळवत ऊसतोड कामगारांनी आर्थिक क्रांती घडवली आहे.
धारूर तालुक्यात बारा गावांतील ऊसतोड कामगारांचा रेशीम शेतीकडे कल वाढला आहे. जवळपास साडेतीनशे शेतकऱ्यांनी तुती पिकाची लागवड केली आहे. वर्षाभरात अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न यातून मिळत आहे. त्यामुळे अनेकांची ऊस तोडणी थांबण्यास मदत झाली आहे. मागील चार ते पाच वर्षांपूर्वी यावर पर्याय म्हणून तालुक्यातील सोनीमोहा, चारदरी येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेती केली होती. सुरुवातीला पाच ते दहा शेतकऱ्यांनी तुती पिकाची लागवड केली होती. त्यात आता भर पडत गेली आहे.
‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, आता भोगलवाडी, चोंडी, जागीर मोहा, गावंदरा, घागरवाडा, फकीर जवळा, कासारी, पा. पारगाव, गांजपुर, आसोला आदी गावांमध्ये रेशीम शेती वाढली आहे. शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच रोजगार हमीतून शेड बांधणी व मजुरी ही मिळत आहे. शासन एकरी चार लाख १८ हजार रुपये तीन वर्षात शेतकऱ्यांना देत आहे. यावर्षी तालुक्यात ६० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे .यापूर्वी साडेतीनशे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता.
सध्या बाजारामध्ये रेशीम कोशास साडेचारशे ते पाचशे रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहे. अनेक शेतकरी कर्नाटक राज्यातील रामनगर तसेच बीड जालना या ठिकाणी रेशीम कोशाची विक्री करीत आहेत. दरम्यान, धारूर तालुक्यातील क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये बाला घाटाच्या डोंगरांनी व्यापले आहे. पूर्वी येथील शेतकऱ्यांना खरीप हंगाम संपल्यास ऊस तोडणीशिवाय पर्याय नसायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. परंतु आता चित्र बदलले आहे.