बीड : तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे चालू आहे. कारखान्याने २२ जानेवारीअखेर, गेल्या ६० दिवसांच्या कालावधीत २,७७,००० मे. टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ९.६६ टक्के साखर उताऱ्याने १,२४,००० क्विंटल साखरचे उत्पादन घेतले आहे. याबरोबरच कारखान्याने ६६,७१,३१० लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले असून १२,९६,२६०० युनिट विजेची निर्मिती केली आहे. कारखान्याने तूर्त प्रती टन २४०० रुपये दराने ऊस बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहेत अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वीरेंद्र सोळंके यांनी दिली.
चेअरमन सोळंके म्हणाले की, साखर कारखान्याने चार जानेवारी अखेरची ऊस बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत. कारखान्याने यापूर्वी चालू गळीत हंगामातील २४ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत गाळप झालेल्या ऊस बिलासाठी अॅडव्हान्स हप्त्याची रक्कम २७०० रुपये प्रति टन प्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केली आहेत. १३ डिसेंबरनंतरची ऊस बिले तूर्त प्रति टन २४०० रू. प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहेत. ४ जानेवारीअखेर गाळप झालेल्या १,१९,१९६ मे. टन उसाच्या बिलांसाठी हा दर दिला आहे. उर्वरीत रक्कम नंतर दिली जाईल.