बीड : ऊसतोड कामगारांचे पाल्य व गरोदरमाता विविध लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आरोग्य विभागाच्या जोखीमग्रस्त भागात नियमित लसीकरण अभियानांतर्गत सुभाषनगर (हडसणी) येथील साखर कारखाना परिसरातील लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळाला. आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हारडफ उपकेंद्र अंतर्गत साखर कारखाना परिसरात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली.
शून्य ते दोन वयोगटातील बारा बालके व सहा गरोदरमातांचे लसीकरण करण्यात आले. लाभार्थी बालके व गरोदरमाता लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या वेळेनुसार लसीकरण केले जात आहे. उर्वरित पात्र सोळा बालके व दोन गरोदरमातांचेही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सहायक संतोष गजभारे यांनी दिली. यावेळी आरोग्यसेविका श्रीमती कदम, आरोग्यसेवक उमेश वागढव, अंगणवाडीसेविका मीना दवणे, आशावर्कर संगीता पाईकराव आदींची उपस्थिती होती.