बीड : भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये कारखान्याच्या माजी चेअरमन आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे.
९ मे २०२३ रोजी कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ११ जून रोजी मतदान होणार होते. २१ जागांसाठी ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ जणांचे अर्ज छाननीत बाद झाले. तर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीपर्यंत म्हणजेच १ जूनपर्यंत १६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने २१ जागांसाठी २१ उमेदवार मैदानात राहिल्याने निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली.