बीड : बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून वैद्यनाथ साखर कारखाना, वैद्यनाथ- ओंकार या नावाने सुरू करण्यात आला आहे. वैद्यनाथ- ओंकार कारखान्यासाठी गाळपास येणाऱ्या उसाला यंदा २७५० रुपये भाव देणार असल्याची घोषणा ओंकार साखर कारखाना लि. (युनिट १ ते ९) ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील यांनी केली.
वैद्यनाथ ओंकार साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामाचा शुभारंभ बाबुराव बोत्रे- पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाला. यावेळी बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले की, वैद्यनाथ कारखाना हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासाठी जीव की प्राण होता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंकजा मुंडे यांनी कारखाना चालवला. यावर्षीच्या हंगामामध्ये पाच लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यांनी उसाला २७५० रुपये भाव देणार असल्याचे जाहीर केले. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर वाढीव हप्ता देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी ओंकार साखर कारखाना लि. (युनिट १ ते ९) ग्रुपच्या संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक ओमराजे बोत्रे-पाटील,वैद्यनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष चंद्रकांत कराड, संचालक ज्ञानोबा माऊली मुंडे (अध्यक्ष पोलिस पाटील संघटना), राजेश गिते, हरिभाऊ गुट्टे, संजय आघाव, रेशीमनाना कावळे, वसंत राठोड, सुरेश माने, वैद्यनाथ ओंकार साखरचे जनरल मॅनेजर गिरीश लोखंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक राजेश गीते यांनी केले.
हे सुद्धा वाचा: बीड : तोडणी कामगारांच्या विमा पॉलिसीचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन : आमदार सुरेश धस यांचा इशारा
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.