बेळगाव : चिकोडी, अथणी, रायबाग, कागवाड तालुक्यांसह सीमाभागातील कार्यक्षेत्र असलेल्या चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १०२ दिवसांत ९ लाख ९९ हजार ८४० टन उसाचे गाळप करून विक्रमी साखरेचे उत्पादन केल्याची माहिती अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी दिली. २२ रोजी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर गाळप हंगामाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक भरतेश बनवणे, अजितराव देसाई, भरमगोडा पाटील, मल्लाप्पा म्हंशाळे, अण्णासाहेब इंगळे, महावीर कात्रळे, व्यवस्थापकीय संचालक आर. बी. खंडगावे, मुख्य व्यवस्थापक एन. एस. हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याकडून सर्वाधिक ऊस वाहतूक व विक्रमी उसाचे उत्पादन घेतलेले शेतकरी, ऊस तोडणी कामगार, सभासद, वाहतूकदार, कंत्राटदार व इतर मान्यवरांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मल्लिकार्जुन कोरे म्हणाले कि, कारखान्याच्या इतिहासात विक्रमी उसाचे गाळप करण्यात आले असून या सुमारे ९ लाख ९९ हजार ८४० टन उसाचे गाळप करण्याबरोबरच साखर उत्पादन वीज उत्पादन व इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले आहे. साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी आमचे मार्गदर्शक केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ (नवी दिल्ली) चे संचालक अमित कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखाने प्रगती करून साखर कारखान्याच्या सभासदासाठी अनेक लाभदायक योजनाही राबविण्यात आल्याचे मल्लिकार्जुन कोरे यांनी सांगितले. या समारंभास साखर कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, अधिकारी, ऊस उत्पादक, कामगार, कंत्राटदार, वाहतूकदार उपस्थित होते.