बेळगाव: आधुनिक शेती तंत्रज्ञानात चांगली पूर्व मशागत, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, माती परीक्षण विषयी माहिती, नवीन बेणे, रुंद सरीचे महत्त्व, एकात्मिक अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, ऊस पिकामधील आळवणी व फवारणी महत्त्वाची आहे. ऊस पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन विश्वजित पाटील यांनी केले.
हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रामपूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक विनायक पाटील होते. पाटील म्हणाले, सभासदांनी एकरी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. बेणे व रोपाची निवड करत असताना स्वतःचे बियाणे प्लॉट निर्माण करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन केले.गेल्या दोन वर्षांपासून सभासदांना एकरी १० हजार रुपयांची रासायनिक खते व लवकर पक्व होणाऱ्या उसाच्या जातीचे रोप देण्यात येत आहेत. यावेळी सचिन कागलकर, भगवान सुतार, शिवराज कुंभार, अजित कमलाकर, महारुद्र जबडे, रंजीत जबडे, अण्णासो लोहार, सूरज कुंभार, राकेश पाटील, विपुल बेळंकी, राजेंद्र संकपाळ, आप्पासो लोहार उपस्थित होते.