बेळगाव : चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने नणदी येथील कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातील बीड, जालना, परभणी जिल्ह्यातून ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी आलेल्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात साखर शाळा सुरू करण्यात आली आहे. चिक्कोडी गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि चिक्कोडी क्षेत्र समन्वयक कार्यालयातर्फे ही साखर शाळा सुरू केली आहे.
या साखर शाळेतील मुलांना लागणारा पोषण आहार, दुपारचे जेवण, पाठ्यपुस्तके, वह्या, पेन व इतर साहित्य शिक्षण विभागातर्फे देण्यात येणार आहे. याबाबत कारखान्याचे प्रधान व्यवस्थापक एन. एस. हिरेमठ यांनी सांगितले की, ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत व प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण खात्याच्या सहकार्याने विशेष शाळा सुरू केली आहे.
क्षेत्रीय समन्वयक आय. एस. इक्कलमार, चिक्कोडीचे मराठी विभागचे सीआरपी एस. एम. माने, जी. एस. कांबळे, पी. डी. मजलट्टी, गंगा शुगर स्कूलचे शिक्षक व्ही. एन. रावणगोळ, साखर शाळेचे शिक्षक एस. एस. कोळी, पी. एम. ठोंबरे, जी. एम. धर्मोजे आणि कारखान्याचे अधिकारी अनिल शेट्टी, सुभाष खोत, तात्यासाब मत्तीवडे, उदय कागले, ऊसतोड मजूर ठेकेदार, मुले उपस्थित होती.