बेळगाव : हिरण्यकेशी साखर कारखाना सभासदांना १७ रुपये दराने ५० किलो साखर देणार

बेळगाव : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखर वितरण करण्याचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतला आहे. सभासदांना १७ रुपये प्रतिकिलो प्रमाणे ५० किलो साखर वितरित होणार आहे. बुधवार (ता. ५) ते डिसेंबरअखेर हे वितरण होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बसवराज कल्लटी यांनी दिली. ते हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी, संचालक बसप्पा मरडी, प्रभूदेव पाटील, बाबासाहेब आरबोळे, शिव नाईक, सुरेंद्र दोडलिंगन्नावर, व्यवस्थापकीय संचालक सातप्पा कर्कीनाईक, प्रशासकीय अधिकारी रवींद्र चौगुले, मोहन कोठीवाले आदी उपस्थित होते.

बसवराज कल्लटी म्हणाले, सन २०२४-२५ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या बिगर सभासद शेतकऱ्यांना १७ रुपये किलो दराप्रमाणे प्रतिटन अर्धा किलो साखर दिली जाणार आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत साखर वितरित केली जाईल. या संदर्भात साखरेची पावती मार्च २०२५ अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पोहोचविण्याचा प्रशासन प्रयत्न करेल. कल्लटी म्हणाले, सन २०२५-२६ या आगामी हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद व इतर शेतकऱ्यांना परिसरातील इतर कारखान्यांप्रमाणे दर दिला जाईल. उसाचे बिल ऊसपुरवठा केल्यावर १५ दिवसांच्या आत प्रत्येकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. आजअखेर कारखान्यातील कंपोस्ट खत प्रतिटन १५०० रुपयांप्रमाणे दिले जात होते. यापुढे ते १००० रुपये प्रतिटन याप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२४-२५ या हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राहिलेली सर्व उसाची बिले खात्यावर जमा करण्याची व्यवस्था केली आहे. आगामी हंगामात प्रति दिन १२ हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सभासद, शेतकरी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. कारखान्याच्या वाटचालीत माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विद्यमान संचालक मंडळात कुठलेही मतभेद नाहीत. सर्व संचालक एकदिलाने काम करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here