बेळगाव : श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संचलित, लैला शुगर्स या कारखान्यामध्ये दुरुस्ती व नवीन दोन बॉयलर बसविण्याचे काम सुरू होते. आता दोन्ही बॉयलरचे काम पूर्ण झाले असून बॉयलरच्या संपूर्ण चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे गळीत हंगामाला सोमवार (ता. ९) पासून सुरुवात झाली आहे. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर व संचालक मंडळाच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आल्या. यावेळी महालक्ष्मी ग्रुपचे संचालक मंडळ व लैला शुगर्सचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खानापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य केले आहे, त्याप्रकारेच यापुढेही करण्याचे आवाहन लैला शुगर्सचे चेअरमन व आमदार विठ्ठल हलगेकर, व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी केले आहे. यावर्षी गाळप क्षमता वाढीच्या कामामुळे तांत्रिकदृष्ट्या कारखाना सुरू होण्यास विलंब झाला. साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढली आहे. आता शेतकऱ्यांच्या उसाच्या गाड्या खाली होण्यास उशीर लागणार नाही. त्यामुळे तालुक्यातील अधिकाधिक उसाचे गाळप होणार आहे, असे हलगेकर यांनी सांगितले.