बेळगाव : हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात ९७ दिवस गाळप करून ६ लाख ३० हजार टनावर उसाचे गाळप केले. सरासरी ११.४० उताऱ्याने ४.५० लाख साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. २ हजार टन ऊस शुगर ज्यूसनिर्मितीसाठी वापरली आहे. कारखान्याने पहिल्यांदाच एम दर्जाच्या साखरेचे ४० टक्के उत्पादन केले असून सर्वाधिक दर मिळणार आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. कारखान्याच्या ३८ व्या गाळप हंगाम सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, कारखाना आगामी दोन वर्षात प्रेसमडपासून सीएनजी, राखेतून विटांची निर्मिती आणि बगॅसपासून टलेट्स निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणार आहे. शिवाय गाळपाची क्षमता वाढवून पंधरा हजार टन केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. हालसिद्धनाथने अडीच कोटी लिटर इथेनॉलची विक्री केली आहे. को-जनरेशनमधून ३.६३ कोटी युनिटची वीजनिर्मिती केली असून १.७० कोटी युनिटची विक्री केली आहे अशी माहितीही जोल्ले यांनी दिली. यावेळी सर्वाधिक ऊस उत्पादक, वाहतूकदार, तोडणी कामगारांना बक्षिस देऊन सत्कार झाला. श्रीकांत बन्ने यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष पवन पाटील यांनी प्रास्ताविक केले. हिराशुगरचे संचालक बाळासो आरबोळे, अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास गुगे यांनी आभार मानले. हिराशुगरचे अध्यक्ष बसवराज कलट्टी, हालशुगरचे संचालक अप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.