बेळगाव : अथणी साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त केंपवाड येथे साखर कारखान्यात ३१ जानेवारी ते एक फेब्रुवारीअखेर आरोग्य शिबिर झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दहा हजारांहून अधिकजणांची मोफत तपासणी व गरजेप्रमाणे मोफत शस्त्रक्रिया केली. शिबिराचे आयोजन श्रीमंत पाटील फाउंडेशनने केले होते.
यामध्ये सांगलीच्या नंदादीप नेत्र रुग्णालय, उषःकाल अभिनव रुग्णालय येथील डॉक्टरांचा सहभाग होता. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते विष्णुअण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमंत पाटील यांनी केले. श्रीमंत पाटील म्हणाले, वाढदिवसानिमित्त परिसरातील गरजू रुग्णांच्या विविध आजारांची तपासणी व शस्त्रक्रियांचे शिबिर आयोजित केले आहे. त्याचा लाभ गरजूंना होत आहे. अथणी, बांबवडे, तांबाळे, रयत, कोरेगाव या पाच कारखान्यांतील पंधराशे रक्तदात्यांनी रक्तदान केले.