नवी दिल्ली : शेतकऱ्यांना केवळ “अन्नदाता” (जेवण देणारे) नव्हे तर “ऊर्जादाता” बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेवमध्ये ते बोलत होते.
मंत्री गडकरी म्हणाले. वाहन ईंधनाच्या रुपात इथेनॉल वापराचे फायदे आता दिसून येत आहेत. सरकारचे पुढील उद्दिष्ट रस्ते निर्मितीच्या साहित्याची आयात कमी करण्याचे आहे. यासाठी भाताच्या पेंढ्या पासून बिटुमेन उत्पादनाचा विचार आहे. ते म्हणाले की, हरित आणि पर्यायी इंधनाला प्रोत्सहन देण्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल अथवा विजेवर चालणाऱ्या वाहनांची खरेदीसाठी व्याजावर अनुदान देण्याचा विचार सरकार करीत आहे.
मंत्री गडकरी म्हणाले, आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनात कृषी क्षेत्राचा सध्याच्या वाटा १२ टक्के आहे. आम्हाला आर्थिक विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी हा वाटा २४ टक्के करण्याची गरज आहे. अद्यापही ६५ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. गेल्या नऊ वर्षात आमच्या सरकारने कृषी आणि ग्रामीण भागावर भर दिला आहे.