भारताच्या अध्यक्षतेखाली पहिल्या जी 20 ऊर्जा संक्रमण कार्यगटाची बैठक आयोजित करण्यासाठी बंगळुरू सज्ज

भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 ऊर्जा संक्रमण कार्यगटाची (ईटीडब्लूजी) पहिली बैठक बंगळुरू इथे 5-7 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जी 20 सदस्य देशांसह बांग्लादेश इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, यूएई आणि स्पेन या नऊ विशेष आमंत्रित अतिथी देशांतील 150 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील.

याशिवाय, जागतिक बँक, आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी ), आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (आयईए), स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय संस्था (सीईएम), संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएनइपी ), आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए), संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय विकास संस्था (यूएनआयडीओ ), आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग (युएनइएससीएपी), संशोधन आणि विकास (आरअँड डी) 20 यांसारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि माहितीविषयक भागीदार संघटनाही या बैठकीचा भाग असतील. ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीत संबंधित मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी अधिकारी देखील सहभागी होतील.

या बैठकीसाठी कर्नाटक सरकारचे पाठबळ असून ते समन्वयकही आहेत. ऊर्जा संक्रमण कार्यगटाची ही पहिली बैठक सहा प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये पुढील प्राधान्यांचा समावेश आहे: (i) तंत्रज्ञानातील दरी दूर करून ऊर्जा संक्रमण (ii) ऊर्जा संक्रमणासाठी किफायतशीर वित्तपुरवठा (iii) ऊर्जा सुरक्षा आणि विविध पुरवठा साखळी (iv) ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि जबाबदारीने वापर, (v) भविष्यासाठी इंधने (3एफ) आणि (vi) स्वच्छ ऊर्जेची सार्वत्रिक उपलब्धता आणि न्याय्य, किफायतशीर तसेच सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमण मार्ग. तर दुसरीकडे , ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीत ‘कार्बन शोषूण घेणे, वापर आणि साठवणूक (सीसीयुएस)’ या विषयावर पूरक उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रही होणार आहे. निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या ‘कार्बन शोषून घेणे ,वापर आणि साठवणूकीचे महत्त्व अधोरेखित करण्यावर हे चर्चासत्र लक्ष केंद्रित करेल. या चर्चासत्रात स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या आव्हानात्मक पैलूंवर आणि मूल्य साखळीच्या विविध तांत्रिक पैलूंचे परीक्षण करतानाच सीसीयुएसच्या भूमिकेवर विचारविनिमय केला जाईल, हा कार्यक्रम यशस्वी उपक्रमांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करेल. याचे प्रतिबिंब उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये दिसू शकेल.

पहिल्या ऊर्जा संक्रमण कार्यगट बैठकीचा एक भाग म्हणून, या बैठकीसाठी उपस्थित प्रतिनिधी इन्फोसिस हरित इमारत संकुल आणि पावागड सौर पार्कला भेट देतील आणि भारताचे अक्षय ऊर्जा क्षेत्रामधील उपक्रम आणि हवामान बदलावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न पाहतील. या प्रतिनिधींना कर्नाटकातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, कला, संस्कृती आणि पाककृती यांचाही अनुभव घेता येणार आहे. भारत सरकारचे ऊर्जा मंत्रालय ऊर्जा संक्रमण कार्यगट बैठकीसाठी नोडल मंत्रालय आहे आणि या बैठकीत लक्ष केंद्रित केलेल्या प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा आणि वाटाघाटींचे नेतृत्व करेल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here