सोलापूर : येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने हंगाम २०२२-२३ साठी पहिल्या क्रमांकाचा ‘बेस्ट डिस्टिलरी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, डिस्टिलरी मॅनेजर डी. व्ही. रणवरे, कामगार व युनियन प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला.
दरम्यान, कारखान्याचे चीफ इंजिनिअर सूर्यकांत गोडसे यांनाही वैयक्तिक स्तरावरील उत्कृष्ट ‘चीफ इंजिनिअर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण झाले.
चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले की, कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची दैनंदिन उत्पादन क्षमता ६० हजार लिटर प्रती दिन आहे. प्रकल्पात मागील तीन वर्षांत एकूण ४४७.८० लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. प्रती टन ४०९.४४ अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे सभासद व बिगर सभासदांना एफआरपी देणे शक्य झाले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर आहे. कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले म्हणाले की, यापूर्वीही कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले आहेत.