पुणे : राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने देण्यात येणारा २०२३-२४ चा मध्य विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार दत्तात्रयनगर, पारगाव – अवसरी बुद्रूक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला. पुण्यातील कार्यक्रमात माजी कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते गुरुवारी पुरस्कार वितरण झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. व्हीएसआयच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत साखर कारखान्यांना विविध पुरस्कारांचे वितरण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
भीमाशंकर कारखान्यातर्फे हा पुरस्कार अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी स्वीकारला. याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, हा पुरस्कार प्राप्त होण्यास कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांचे दूरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे.