पुणे :केंद्र सरकार सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी दिले. नव्या सहकार मंत्रालयाकडून विरोधी पक्षांकडून चालविल्या जाणाऱ्या सहकारी संस्थांवर कारवाई केली जाईल अशी शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत बोलताना मंत्री शहा म्हणाले, सहकार मंत्रालय हे या क्षेत्राला मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या क्षेत्राची मोडतोड केली जाणार नाही.
शहा यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सहकारी साखर कारखानदारी सुरू राहावी यासाठी आम्ही सर्व ती मदत करू. सहकारी कारखाने खासगी मालकीचे होण्याचे टाळण्यासाठी जे करावे लागेल ते निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले.
शहा म्हणाले, राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण झाले आहे. अनेक सहकारी कारखान्यांची स्थिती खराब आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार सहकारी कारखान्यांना जी शक्य आहे ती सर्व मदत करीत आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.