बागपत : ऊस थकबाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रालोदच्या बुढाना आणि छपरौलीच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली चौगामातील शेतकऱ्यांनी मुजफ्फरनगरमध्ये भैसाना साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी पाच जानेवारीपर्यंतची ५४ कोटी रुपये ३० जूनअखेर दिले जातील असे आश्वासन दिले. चौगामा विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अद्याप भैसाना साखर कारखान्याकडे अडकले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. ऊस थकबाकीबाबत रालोदचे बुढ़ानाचे आमदार राजपाल बालियान, छपरौलीचे आमदार अजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली चौगामा विभागातील शेतकरी राजीव प्रधान, गुल्लू प्रधान, मास्टर सुरेश राणा, विनोद राणा, देवपाल राणा, संजय छिल्लर, देवेंद्र धनौरा, बिल्लू, जयपाल सिंह आदींनी कारखान्याचे युनिट हेड जंगबहादुर तोमर, ऊस विभागाचे महाव्यवस्थापक देवेंद्र सिंह आदींची भेट घेतली.
याबाबत दैनिक जागरणमधील वृत्तानुसार, शेतकऱ्यांची ऊस थकबाकी त्वरीत द्यावी अशी मागणी आमदारांनी केली. विज विभागाकडून शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याचे तसेच त्यांना दैनंदिन कामकाजास अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तोमर यांनी पाच जानेवारीपर्यंत गाळप केलेल्या उसापैकी ५४ कोटी रुपये ३० जूनपर्यंत केले जाईल असे सांगितले. उर्वरीत ऊस बिलांबाबत रोस्टरप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. रालोदचे आमदार राजपाल बालियान यांनी सांगितले की, याबाबतची बोलणी सकारात्मक झाली आहेत. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी जून महिन्यात ५४ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.