मुजफ्फरनगर : आगामी गाळप हंगाम दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता असून त्याची कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील आठपैकी सात साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील पूर्ण ऊस बिले दिली आहेत. मात्र, भैसाना साखर कारखान्याकडे अद्याप शेतकऱ्यांची तब्बल २३५ कोटींची थकबाकी आहे. कारखान्याने ऊस बिले थकविल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले अदा केली आहेत. पाच साखर कारखान्यांनी आधीच ऊस बिले दिली होती. तर मोरना आणि मन्सूरपूर या साखर कारखान्यांनी एक आठवड्यापूर्वी थकीत ऊस बिले अदा केली आहेत. जिल्ह्यातील २०२२-२३ या हंगामात खतौली साखर कारखान्याने सर्वाधिक, तर रोहना साखर कारखान्याने कमी गाळप केले आहे.
भैसाना साखर कारखान्याने १२६.४५ लाख क्विंटल उसाचे गाळप करून १२.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी संजय सिसोदिया म्हणाले की, भैसाना कारखाना वगळता इतरांनी पूर्ण पैसे दिले आहेत. या कारखान्याला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पैसे लवकर मिळावेत यासाठी कारखान्यावर दबाव वाढवला आहे. तर भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले की, कारखान्याने पैसे थकवल्याने भाकियूचे आंदोलन सुरू आहे.