शहजादपूर : भारतीय किसान युनियन (चढुनी गट) व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२२-२३ वेळेवर सुरू करावा अशी मागणी केली. बनौंदी साखर कारखान्यात या शेतकऱ्यांनी हंगामातील अडचणीसह विविध प्रश्नांबाबत बैठक घेतली. एसडीएम बिजेंद्र सिंह यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात येतील, असे आश्वासनही दिले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे जिल्हाध्यक्ष मलकीयत सिंह व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद राणा यांनी सांगितले की, कारखान्यातील देखभाल, दुरुस्तीच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. यांदरम्यान कर्मचाऱ्यांनी साहित्य अपुरे असल्याची माहिती दिली. काही अधिकारी अडवणूक करीत असल्याने हंगाम सुरू करण्यास उशीर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संघटनेने याविषयी ब्रिजेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. यमुनानगर कारखाना तीन नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नारायणगढ कारखाना एक नोव्हेंबरपासून चालवण्याची मागणी करण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महासचिव राजीव शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष जसविंदर सिंह, राजीव राणा, मनीष गुर्जर, गुलाब सिंह, रामपाल, रमेश राणा, सादा सिंह, बॉबी राणा आदी उपस्थित होते.