भंडारा : वैनगंगा नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या परसवाडा शेतशिवारात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. या परिसरात ६०० ते ७०० एकर शेतीत शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेतले आहे. या सर्व उसाची उचल होण्याची अपेक्षा असताना मानस ॲग्रो कारखान्याने फक्त १५० ते २०० एकर शेतीतील उसाची उचल केली आहे. उर्वरित ४०० एकर शेतीत उसाचे पीक तोडणीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे पीक जाळायचे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मानस ॲग्रो प्रा. लि. देव्हाडा ऊस कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याला निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ऊसतोड कामगारांना वेतन न मिळाल्याने कामगारांच्या टोळ्या गावाकडे परतल्या आहेत. यामुळे ऊस तोडणीविषयी चिंता निर्माण झाली आहे. येत्या १० दिवसांत उसाची तोडणी आणि उचल झाली नाही तर, संपूर्ण उभे पीक जाळून टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यात अंकुश हुड, अरुण राऊत, अतुल नंदरधने, नरेश राऊत, बाळकृष्ण विठुले, वसंता पांडे, गंगाधर गौपाले, अनिल लांडगे, गोविंदा शेंडे व ३५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. दरम्यान, मजुरांनी ऊस तोडणीसाठी थेट दरात वाढीची मागणी केली आहे. प्रति टनामागे २०० रुपयांची वाढ झेपण्यासारखी नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले. याशिवाय, जळीत उस कारखान्यात गेल्यास यापोटी कारखान्याकडून २० टक्के रक्कम कपात केली जाते. याला शेतकऱ्यांचा विरोध आहे.