भंडारा : भात उत्पादक भंडारा जिल्ह्यातील काही भागात उसाचेही उत्पादन घेतले जाते.तुमसर तालुक्यातील देव्हारा येथे मानस साखर कारखान्याला परिसरातील आणि जिल्ह्याबाहेरील शेतकरी ऊस पुरवठा करतात. येथील कारखान्याला फेब्रुवारी ते मे अशा चार महिन्यांत ऊसाचा पुरवठा केला. मात्र, कारखान्याने ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मानस साखर कारखान्यासमोर घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.
साखर कारखान्याने गाळपाला ऊस पाठवल्यानंतर १५ दिवसांत ऊस खरेदीची रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र, वारंवार चकरा मारुनही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्यावर धडक देत उसाचे पैसे मिळावे अशी मागणी केली. चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरदेखील शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी कारखाना प्रशासनाकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. तरीदेखील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी मानस कारखान्यावर धडक मोर्चा काढला. यावेळी कारखान्याचे प्रवेशद्वारावर प्रचंड घोषणाबाजी करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.