भंडारा : जिल्ह्यात कृषी विभागाने ऊस पिकासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाढलेला वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि उसाची बिले देण्यास कारखान्याकडून होणारा उशीर यामुळे शेतकरी उसाऐवजी पुन्हा भात पिकाकडे वळले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यात साखर कारखान्याअभावी उसाचे लागवड क्षेत्र घटले आहे.
लोकमतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पूर्वापार भात पिकाची लागवड करीत आहेत. त्यातही तेल व डाळवर्गीय पिकांसोबत कडधान्य, भाजीपाला, ऊस आदी पिके घेतली जातात. अलिकडे कृषी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. सिंचनाच्या सोयीनुसार शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. १९८० च्या दशकात सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू झाला. त्यानंतर पवनी तालुक्यात आणखी एका कारखान्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, ते अपयशी ठरले. शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्यावर भर दिला. पाणी मुबलक असल्याने शेकडो टन ऊस साखर कारखान्यांना पुरवठा होत होता.
जिल्ह्यातून मौदा व उमरेड तालुक्यातील कारखान्यांनासुद्धा ऊस पुरवठा केला जात होता. मात्र, सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आल्याने त्याची विक्री करण्यात आली. लाखांदूर येथे लघु साखर कारखाना स्थापन झाला होता. त्याचा फायदा लाखांदूर व चौरास भागातील शेतकऱ्यांना झाला. जिल्ह्यातील ऊस क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत होते. मात्र, कारखान्यांकडून पैसे देण्यास होणारा उशीर, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे पाठ फिरवली. लाखांदूर येथील हा कारखानाही बंद पडला आहे. आता शेतकरी पारंपरिक भात पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यातील कोका, न्यू नागझिरा आणि कऱ्हांडला- पवनी- उमरेड या अभयारण्यामुळे रानडुकरे व अन्य प्राण्यांचा उपद्रव ऊस शेतीला होतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड बंद केली आहे.