अहमदनगर : मराठवाड्याच्या सीमारेषेवर वसलेले जेमतेम एक हजार लोकवस्तीच्या मुंगेवाडी गावातील ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने जलसंपदा विभागाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विजय गोकुळ भोसले यांनी शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न साकारले. जलसंपदा विभाग मार्फत जुलै-२०१९ मध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. कोरोना महामारीमुळे परीक्षेला विलंब झाला. ऑगस्ट- २०२२ मध्ये ही परीक्षा झाली. एप्रिल २०२३ मध्ये निकाल जाहीर झाला आणि विजय यांना कनिष्ठ अभियंता वर्ग-२ पद मिळाले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
विजय यांनी मुंगेवाडीतच जि.प. शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण दररोज चार किलोमीटरचा पायी प्रवास करत पखरुड येथे घेतले. दहावीच्या परीक्षेत ८५.८८ टक्के गुण मिळवल्यानंतर बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून डिप्लोमा इंजिनिअरिंग केले. त्यानंतर पुण्यातील ट्रिनिटी महाविद्यालयातून ७७ टक्के गुण घेऊन इंजिनिअरिंग पूर्ण केले. प्रशासकीय सेवेचा ध्यास घेवून अभ्यास केला. मध्यंतरी परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे प्रचंड मानसिक ताण होता. या काळात त्यांना आई-वडील, मोठा भाऊ आणि मित्रांनी खूप धीर दिला. शेतकरी व ऊसतोड कामगाराचा पुत्र असल्याने वडिलांच्या शेतातील कष्टाची जाणीव ठेवून जलसंपदा क्षेत्रात भरीव काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.