नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विविध संघटनांनी आज आणि उद्या भारत बंदचे आयोजन केले आहे. त्याचा परिणाम देशभरात विविध ठिकाणी दिसून येत आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी महासंघानेही या बंदला पाठिंबा दिला आगे. केंद्रीय ट्रेड युनियनच्या एका संयुक्त मंचने राष्ट्रव्यापी संपाची घोषणा केली आहे. कामगार, शेतरी आणि लोकांना धोका पोहोचविणाऱ्या सरकारच्या धोरणांविरोधात हा भारत बंदचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग नोंदवला आहे. बँकांचे खासगीकरण करण्यासह बँकिंग विधेयक सुधारणा २०२१ च्या विरोधात बँकांच्या संघटना यात सहभागी झाल्या आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने कमी केलेला व्याज दर, इंधनाचे वाढते दर या बाबीही यास कारणीभूत आहेत.
केरळमध्ये भारत बंदमुळे रस्ते ओस पडल्याचे दिसले. बंदच्या काळात केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने आपली सेवा पुरवली. आपत्कालीन सेवांना यातून वगळले आहे. पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पाच संघटनांना यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर बंदचे परिणाम दिसू लागले असले तरी, राज्य सरकारने मात्र कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सांगितले आहे. भाकपचे खासदार बिनॉय विश्वम यांनी राज्यसभेत दोन दिवसांच्या संपाची नोटीस दिली. तर बिकाशरंजन भट्टाचार्य यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. बंदला अखिल भारतीय असंघटीत कामगार आणि कर्मचारी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनीही यास पाठिंबा दिला आहे.