भावनगर बनणार कंटेनर केंद्र, १००० कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा: मांडविया

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी गुजरातमधील भावनगरमध्ये कंटेनर केंद्र विकसित करण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय बंदरे, जलमार्ग मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.

पीटीआयशी बोलताना मांडविया म्हणाले, सरकारने कंटेनरच्या निर्मितीसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू केले आहेत. याचा उद्देश कंटेनगर निर्मितीमध्ये आपण आत्मनिर्भर होणे असा आहे. या माध्यमातून खासगी क्षेत्राकडून १००० कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. तसेच यातून किमान एक लाख लोकांना रोजगार मिळू शकतो, असा विश्वास सरकारला वाटतो.

जागतिक स्तरावर कंटेनरची कमतरता कमी करण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कंटेनरच्या कमतरतेमुळे संबंधित व्यवसाय अडचणीत येण्यासह विविध मालांच्या मागणीवर परिणाम झाला आहे.

मांडविया म्हणाले, भारतात दरवर्षी ३.५ लाख कंटेनर्सची गरज असते. भारतात कंटेनरचे उत्पादन होत नाही. आपल्याला मुख्यत्वे जागतिक उत्पादक असलेल्या चीनवर अवलंबून रहावे लागते. आम्ही गुजरातमधील भावनगरमध्ये कंटेनर निर्मिती केंद्र विकसित करीत आहोत. आम्ही येथे कंटेनर उत्पादनासाठी दहा ठिकाणांची निवड केली आहे. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याचे मंत्री मांडविया म्हणाले.

ते म्हणाले, मंत्रालयाने गेल्या सहा महिन्यांत रि-रोलिंग, फर्नेस निर्मात्यांच्या मदतीने भावनगरमध्ये कंटेनर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली. आम्हाला या क्षेत्रात खासगी गुंतवणूकदारांकडून १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. यासोबतच आम्हाला स्थानिक स्तरावर एक लाख रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला बळ देणारा हा उपक्रम असल्याचे मंत्री मांडविया म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here