सोलापूर : भीमा नदीपात्रातून नदीच्या परिसरात असणारे सहकारी, खासगी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने पाणी उचलतात. त्याबदल्यात पाटबंधारे खात्याला पाणीपट्टी देत असले तरी यापुढे त्याच साखर कारखान्यांना त्या बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्याची तयारी पाटबंधारे खात्याने दाखविली आहे. यामध्ये त्या कारखान्यातर्फे खर्चवजा पाणीपट्टी वसुली केली जाणार आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याबरोबर साखर कारखान्यांचा फायदा होणार आहे. या प्रस्तावाला बहुतांश साखर कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
पंढरपूर येथे पंढरपूर-भीमा पाटबंधारे विभागाची बैठक पार पडली. यावेळी भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूरचे कार्यकारी अभियंता सो. क. हरसुरे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला आ. समाधान आवताडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ‘सहकार शिरोमणी’चे कल्याणराव काळे, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, ‘नीरा भीमा’चे अध्यक्ष लालासाहेब पवार आदी उपस्थित होते.
यापूर्वी भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची देखभाल-दुरुस्ती, नदीला पाणी सोडल्यानंतर दरवाजे बसविणे काढणे आदीची जबाबदारी खासगी ठेकेदारांना टेंडर प्रक्रियेद्वारे दिली जात होती. यामध्ये अनेक ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्याच्या तक्रारी शेतकरी, कारखानदाराकडून केल्या जायच्या शिवाय पाणीपट्टी वसुलीलाही अडचणी येत. मात्र आता पाटबंधारे नवीन प्रस्तावामुळे कारखान्यानी जबाबदारी घेतल्यास साखर कारखान्यांनाही याचा फायदा होणार आहे. यावेळी धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, ‘विठ्ठल’चे कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, ‘पांडुरंग’चे एन.जे.इंगळे, युटोपियन शुगर्सचे अनिल भोसले आदी उपस्थित होते.