पुणे : एमआरएन भीमा शुगर अँड पॉवर प्रा. लि. संचालित पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना यावर्षी वेळेत सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी कारखाना वेळेत सुरू न झाल्याने साखर उत्पादनावर परिणाम झाला होता. यावर्षी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात कारखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भीमा-पाटस साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली. कारखान्याने यंदा दहा लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले.
भीमा-पाटस कारखान्यातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. १२) संचालक, प्रशासकीय अधिकारी, सभासद व कामगारांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी कारखाना पूर्णक्षमतेने ऊसगाळप करेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी भीमा-पाटस कारखान्याने ६ लाख ३६ हजार टन ऊसगाळप करीत ७ लाख ४ हजार साखरपोती उत्पादित केली. ११.७० टक्के साखर उतारा मिळाला. ६२ लाख लिटर इथेनॉलनिर्मिती करण्यात यश आले. यावर्षी साखर कारखाना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. यंदा १० लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करू, असे कारखान्याचे संचालक विकास शेलार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला वेळेवर नोंदी दिल्या असून, ट्रॅक्टर मालकांनी देखील ऊसतोड टोळ्यांबाबत करार केले आहेत. शेतकरी, सभासदवर्गाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही. शेतकरी वर्गाचे हित जोपासले जाईल. वेळेवर पेमेंट देखील केले जाईल, असे आ. कुल यांनी सांगितले आहे. रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष आ. कुल, उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक, सभासद शेतकरी, कामगार उपस्थित होते.