पुणे : पारगाव-दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने यंदा २,६३० रुपये ऊस दर दिला आहे. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा केले आहे. त्यानंतर २८०० रुपये प्रमाणे बाजार भाव दिला असून २६३० पैकी उर्वरित १७० रुपये लवकरच ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा होतील. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर एफआरपीनुसार ३,१०० रुपये दर शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केली. कारखान्याच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून काही कालावधीसाठी कर्ज घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहे. असेही बेडे यांनी स्पष्ट केले.
उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने चालू गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून सुमारे पाच लाख १४ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. उर्वरित मार्च अखेरपर्यंत सुमारे साडेपाच ते सहा लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप होईल. मार्च अखेरपर्यंत सर्व नोंदणी नुसार उसाचे गाळप होणार आहे. अंतिम दर वार्षिक सभेत जाहीर करणार आहे. ज्येष्ठ संचालक बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे पाटील, मच्छिंद्र गावडे, रामचंद्र ढोबळे, पोपटराव थिटे, प्रिया बाणखेले, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, सचिव रामनाथ हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.