पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मागील गाळप हंगाम, २०२३-२४ मध्ये गाळप केलेल्या उसास अंतिम ऊस दर प्रती टन ३२०० रुपये जाहीर केला होता. त्यातील उर्वरित रक्कम २५० रुपये प्रती टनाप्रमाणे एकूण रक्कम २७ कोटी ७३ लाख सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. कारखान्याचे संस्थापक संचालक व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे असे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.
अध्यक्ष बेंडे म्हणाले की, कारखान्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून व दीपावलीसाठी साखर वाटप सुरु करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. कारखान्याने एकूण ११ लाख नऊ हजार ४६८ टन उसासाठी एफआरपी प्रती टन २७९० रुपये असतानाही २,९५० रुपये टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना यापूर्वीच अदा केली आहे. आता उर्वरीत २५० रुपये प्रती टनाप्रमाणे होणारी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. दरम्यान, कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्तीची रक्कम वेळेत दिलेली आहे. वाढीव रक्कम दिलेली आहे. आता गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांनी कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.