कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांपुढे यंदा ऊस तोडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही स्थिती विचारात घेऊन भोगावती साखर कारखान्याने पुढील वर्षीच्या ऊसतोडीबाबत आतापासूनच योग्य नियोजन केले आहे. पुढील वर्षी सहा लाख टन गाळप करण्यासाठी आमचे उद्दिष्ट असेल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखान्यासमोरही अनेक तोडणीच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुढील हंगामातील ऊस तोडणीबाबत याचे योग्य नियोजन लावण्यासाठी यंदापासूनच धोरणे ठरविण्यात आली आहेत. संचालक मंडळाने स्थानिक आणि बाहेरच्या ऊस तोडणी टोळ्यांसाठी वेगवेगळे नियम व कार्यक्रम आखले आहेत. यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळेल, यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न असतील. यावेळी उपाध्यक्ष राजाराम कवडे, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे यांसह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.