कोल्हापूर : भोगावती कारखान्याच्यावतीने सहवीज निर्मिती ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे फायद्याचे ठरेल. कारखान्याकडून दोन मेगावॅटचा प्रकल्प राबविणे शक्य आहे. त्यादृष्टीने तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी दिली. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. यंदा ऊस तोडणीत सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न करणार आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने सर्वांनी मिळून मार्ग काढणे गरजेचे असून, यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सहकार्याचे आवाहन त्यांनी केले. कारखान्याची सूत्रे घेतल्यापासून पारदर्शक आणि काटकसरी कारभारातून विविध मार्गांनी १० ते १५ कोटींची बचत केली असे ते म्हणाले.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, कारखान्याने डिस्टलरी स्वतःच्या ताब्यात घेऊन चाचणी हंगाम घेतला आहे. पुढील हंगामापासून डिस्टलरीतून पूर्ण क्षमतेने उत्पादन घेतले जाणार आहे. साखर, मोलॅसिस, बगॅस विक्रीही चांगल्या दराने केली आहे. यावेळी माजी अध्यक्ष दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला. ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे, नूतन खासदार शाहू महाराज, जिल्हा बँकेचे नूतन संचालक राजेश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. स्वाभिमानीचे जालंदर पाटील यांनी मांडला. जनार्दन पाटील, माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, अशोकराव पवार, शिवसेनेचे अजित पाटील, निवास पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला. जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, एम. आर. पाटील, माजी उपाध्यक्ष नामदेवकाका पाटील आदी उपस्थित होते. प्र. कार्यकारी संचालक संजय पाटील-पिरळकर यांनी स्वागत केले.