कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याने यंदा साडेपाच लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा उसाला प्रती टन विनाकपात ३२०० रुपये दर देण्यात येणार आहे. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ऊस भोगावती सहकारी साखर कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले. शाहूनगर परिते येथील भोगावतीचा ६६ वा गळीत हंगाम समारंभ ज्येष्ठ सभासद व निवृत्त कामगार दिनकर भोसले व नानूबाई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील व रुपाली पाटील यांच्या हस्ते ऊस गव्हाणीचे पूजन करण्यात आले.
संजय पाटील म्हणाले की, साडेपाच लाख टन ऊस गाळप करण्यासाठी काही अडचण येणार नाही. एफआरपी ३१९८ पर्यंत येणार आहे. विनाकपात ३२०० देणार आहोत. कारखान्याकडे ८,२३५ एकर क्षेत्र ऊस नोंद आहे असे सांगण्यात आले. यावेळी निवडणूक काळात कोणीही कामगारांनी कामावरून बाहेर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. सचिव उदय मोरे यांनी स्वागत केले. ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. पाटील, कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, दिनकर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. विजय पाटील व दत्तात्रय पाटील, सुरेश पाटील, साताप्पा चरापले, दत्त पाटील, सागर पाटील, संतोष शहा आदी उपस्थित होते.