कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या हंगामात कारखान्याने पाच लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला असून, ऊस उत्पादकांची व तोडणी ओढणीची सर्व बिले आदा केली आहेत. आगामी हंगामात सहा लाख टन गाळप निश्चितच होईल, असा विश्वास आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. शाहूनगर – परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मिलरोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते.
कारखान्याचे माजी संचालक दिनकरराव पाटील- आणाजेकर यांच्या हस्ते विधिवत मिलरोलरचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक प्र. कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, वर्क्स मॅनेजर जी. जी. लोकरे, चीफ केमिस्ट डी. डी. किल्लेदार, शेती अधिकारी एस. बी. चरापले, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, शिवाजी डोंगळे, कामगार प्रतिनिधी सर्जेराव पाटील व तानाजी पाटील आदी उपस्थित होते.