कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण ३७३ उमेदवारांनी माघार घेतली. शुक्रवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला कपबशी, शिव शाहू परिवर्तन आघाडीला अंगठी, तर दादासाहेब पाटील कौलवकर पॅनेलला शिटी असे चिन्ह मिळाले आहे. निवडणूक अधिकारी नीलकंठ करे, सहायक निवडणूक अधिकारी सुनील धायगुडे हे काम पाहत आहेत. निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे .
सत्तारुढ आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील गट, क्रांतीसिंह संपतराव पवार-पाटील शेकाप गट, वसंतराव पाटील जनता दल यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले. विरोधी माजी चेअरमन धैर्यशील पाटील यांच्या दादासाहेब पाटील-कौलवकर पॅनेलला शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.
माजी चेअरमन सदाशिवराव चरापले काँग्रेस गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष डॉ. जे. जी. पाटील, माजी व्हा. चेअरमन हंबीरराव पाटील, नामदेव पाटील भाजप, शिवसेना माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे अजित पाटील, शे.का. पक्षाचे बाबासाहेब देवकर, संजय डकरे, तसेच रिपाई यांच्या शिव-शाहू परिवर्तन आघाडीला अंगठी हे चिन्ह मिळाले आहे. साई उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांतदादा पाटील-कौलवकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांना सिलिंडर हे चिन्ह मिळाले आहे.