कोल्हापूर : पुईखडी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि कारखाना वाचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत असा सूर व्यक्त करण्यात आला. मात्र या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. विविध १२ राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा मतप्रवाह कायम राहिला.
ज्येष्ठ नेते पी. डी. धुंदरे म्हणाले की, भोगावती कारखान्यात काँग्रेस पक्ष सत्तारुढ आहे. त्यांना सत्तेत अर्धा हिस्सा मिळावा. इतर पक्षांना ताकदीप्रमाणे संधी मिळावी. तरच भविष्यात भोगावती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर येईल. कारखाना वाचवायचा की संचालक व्हायचे आहे, याचा विचार करून सर्वांनी चर्चा करावी. साखर कारखान्यावर दरवर्षी तीस कोटी रुपये कर्ज वाढत आहे. त्यासाठी भोगावती कारखान्याची निवडणूक बिनविरोध गरजेचे आहे.
यावेळी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, निमंत्रक बी. के. डोंगळे, शेकापचे ज्येष्ठ नेते केरबाभाऊ पाटील, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगुले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, अजित पाटील, अरुण जाधव, वसंतराव पाटील, बाळासाहेब वाशीकर, अभिषेक डोंगळे यांची भाषणे झाली. यावेळी चंद्रकांत पाटील, मोहन धुंदरे, डॉ. सुभाष पाटील आदी उपस्थित होते.