कोल्हापूर : भोगावती कारखान्याचा कारभार पारदर्शक असून, गळीत हंगाम मोठ्या जोमाने सुरू झाला असून, यंदाच्या हंगामात सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप निश्चितपणे होईल. त्यामुळे सर्व ऊस उत्पादकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कारखान्याला गाळपासाठी ऊस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. शाहूनगर, परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ५,१११ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कारखान्याचे संचालक प्रा. ए. डी. चौगुले यांच्या हस्ते पोती पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील- कामगार प्रतिनिधी धनाजी पोकर्णेकर, दत्तात्रय हायकर, सचिव उदय मोरे, चीफ केमिस्ट धनाजी किल्लेदार, वर्क्स मॅनेजर जी. जी. लोकरे, तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील आदी उपस्थित होते.