कोल्हापूर : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने (बिद्री) आजअखेर ६ लाख ६० हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. आणखी ३ लाख टन ऊस कार्यक्षेत्रात शिल्लक आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत हंगाम सुरू राहील, अशी माहिती कारखान्याचे शेती अधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली. कारखान्याने यंदा गळिताला येणाऱ्या उसाला उच्चांकी ३,४०७ दर दिल्यामुळे शेतकरी प्राधान्याने ऊस पुरवठा करीत आहेत, असे ते म्हणाले.
शेती अधिकारी पाटील म्हणाले की, बिद्री साखर कारखान्याने उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम जोपसली आहे. त्यामुळे शेतकरी या कारखान्याकडे ऊस पाठविण्यास पसंती देतात. यंदा कारखान्याचे ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजअखेर ६.६० लाख टन गाळप पूर्ण झाले आहे. अजून ३ लाख टन ऊस कार्यक्षेत्रात शिल्लक आहे. सध्या ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालल्याने खुद्द शेतकरी वर्गालाच ऊसतोड करावी लागत आहे. त्यामुळेही ऊस तुटण्यास विलंब होत आहे. त्यातून हंगाम मार्च अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.