कोल्हापूर : सहवीज प्रकल्प, इथेनॉलसारखे प्रकल्प उभा करून बिद्री कारखान्याला समृद्ध केले आहे. गेल्या १९ वर्षांत बिद्री साखर कारखान्याच्या जडणघडणीत, गौरवात, कर्तृत्वात भर पडेल असे समृद्ध काम केले आहे. त्यामुळे बिद्रीतील शेतकरी, सभासद ठामपणे आमच्या मागे आहेत, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी केले. भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द येथे सभासद संवाद मेळाव्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी टी. एल. पाटील होते.
सभासदांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचे कायम स्रोत राहावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले. बिद्री कारखाना हा चार तालुक्यांची मातृसंस्था आहे. त्याचे हित जोपासण्याचे काम स्वाभिमानी सभासदांनी आमच्यावर सोपवले आहे असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष टी. एल. पाटील यांनी जिल्ह्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत बिद्रीचा कारभार स्वच्छ आहे. याचे सारे श्रेय के. पी. पाटील यांच्या कुशल व्यवस्थापनाला आहे असे सांगितले. कार्यक्रमात सयाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सरपंच कृष्णात मांडे, प्रवीण मांडे यांची यावेळी भाषणे झाली. नागोजी बिरबळे, शेखर पाटील, शहाजी पाटील, निवृत्ती पाटील, बाळासो अकोळकर, गणपतराव कल्याणकर, श्रीपतराव कल्याणकर आदी उपस्थित होते. शेखर पाटील यांनी आभार मानले.