कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्यातर्फे उभारण्यात आलेला इथेनॉल प्रकल्प दोन महिन्यांत सुरू करणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. बिद्री येथील कारखान्याच्या ६६ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीनंतर गेली अनेक वर्षे प्रलंबित असेलली ५०० कामगारांची भरती केली जाईल, अशी माहितीही अध्यक्ष पाटील यांनी दिली.
के. पी. पाटील म्हणाले की, कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे येत्या हंगामात प्रती दिनी ८,००० मेट्रिक टन ऊस गाळप केले जाईल. प्रत्येक महिन्याला किमान अडीच लाख टन ऊस गाळप होईल. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहणार नाही. कारखान्याच्यावतीने एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सभेत ‘काळम्मावाडी’चे पाणी वाचविण्यासाठी सुळकूड पाणी योजना रद्द करण्याचा ठराव भूषण पाटील यांनी मांडला. शासनाने साखरेचा दर प्रति किलो ४० रुपये करावा व साखर निर्यातीचे धोरण ठरवावे आदी ठराव मंजूर करण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांतर्फे के. पी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टनास ४०० रुपये जादा ऊस दर मिळावा, यासाठी सभा प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी सभेचे नोटीस वाचन केले. ‘गोकुळ’ चे संचालक रणजित पाटील, नाथाजी पाटील, मनोज फराकटे, शामराव देसाई, ‘बिद्री’चे आजी, माजी संचालक व सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.