बिद्री, कोल्हापूर दि. ३०: येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्याची प्रतिटन ३२०९ रुपये प्रमाणे एकरक्कमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सबंधीत बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री. चौगले यांनी म्हटले आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या १ लाख १६ हजार ९७६ मे. टन ऊसाची प्रतिटन ३२०९ रुपये प्रमाणे ऊसबिलाची रक्कम ३७ कोटी, ५३ लाख, ७८ हजार, ९८५ रुपये एवढी होते. त्यापैकी, १६ कोटी, ७७ लाख, १० हजार, ६०२ रुपये एवढी रक्कम विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे. तसेच १८ कोटी, ९७ लाख, ३८ हजार ६१ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या सबंधीत बँक खात्यावर जमा केली आहे.
कारखान्यांने आजअखेर २९ दिवसात २ लाख १७ हजार ६७२ मे. टन ऊसगाळप करून २ लाख ३८, ९५० साखर पोती उत्पादित झालेली आहेत. सरासरी १०.८५ टक्के साखर उतारा आहे. गळीत हंगामात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवलेला आहे, त्यांनी आपापल्या संबंधित बँकांमध्ये व सोसायट्यांमध्ये संपर्क साधून ऊस बिलाच्या रक्कमा व पावत्या घेऊन जाव्यात. विस्तारीकरणानंतर कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ झाली असून सरासरी प्रतिदिन ८ हजार मे. टनाने ऊस गाळप सुरु आहे. यासाठी सभासद बंधू व शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले आहे.