कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात सत्ताधारी के.पी.पाटील गट आघाडीवर आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात उत्पादक सभासद गट क्रमांक 1 राधानगरीमधून राजेंद्र पांडुरंग पाटील, राजेंद्र पांडुरंग भाटळे आणि राजेंद्र कृष्णाजी मोरे हे सत्ताधारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
मुस्कान लॉन येथे सकाळी १०८ टेबलवर मतमोजणी सुरू आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत निकाल जाहिर होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी सांगितले. मतमोजणीसाठी सुमारे साडेसहाशे कर्मचारी नियुक्त केले आहेत. बिद्री साखर कारखान्याची निवडणूक प्रचंड चुरशीने झाली. दोन्ही आघाड्यांनी प्रत्येक मतासाठी प्रचंड मेहनत घेतली. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच बड्या नेत्यांनी या निवडणूकीत भाग घेतला होता. त्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मतमोजणीसाठी ४८० कर्मचारी नियुक्त केले आहेत. एकूण १२० टेबलवर मतमोजणी होत आहे. रो ऑफीसर १२, झोनल ऑफीसर ६, सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत कल समजेल तर सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार आहे.