कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्यासाठी रंगणार दुरंगी लढत

कोल्हापूर : श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (बिद्री) २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुरंगी लढत रंगणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी आघाड्यांची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी आणि विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने उमेदवारांची घोषणा केली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले दोन उमेदवार रिंगणात कायम ठेवले आहेत. याशिवाय मेहुणे-पाव्हणे एकमेंकांविरोधात उभे ठाकल्याने निवडणुकीविषयी उत्सुकता वाढली आहे.

सद्यस्थितीत या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष – उपाध्यक्षांसह १३ संचालक रिंगणात आहेत. कोल्हापूर येथील अक्षता मंगल कार्यालयातील बैठकीत सत्ताधारी गटाने यादी जाहीर केली तर विरोधी गटाने धैर्यप्रसाद हॉल येथे उमेदवारांची घोषणा केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील आदींच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

दरम्यान, कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही अर्ज दाखल केले होते; परंतु सत्ताधारी व विरोधी आघाडीने संघटनेला जागा वाटपात संधी दिली नसल्याने दोन उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे मेहुणे-पाहुणे एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे आणि संचालक राजेंद्र पाटील हे मामा-भाचे गट क्रमांक १ मधून एकमेकांविरोधात लढत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here